प.पू.भाईनाथ महाराज यांचा जन्म कार्तिक वद्य एकादशी २३ नोव्हेंबर १९०५ रोजी रात्रौ.१०.३० वा. पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव त्रिंबक सीताराम कारखानीस व मातेचे नाव लक्ष्मीबाई असे होते.
त्यांचे बालपणाचे शिक्षण एज्युकेशन सोसायटी पुणे या शाळेत झाले. नंतर न्यू इंग्लिश स्कूल, पुणे या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले.
सन १९१८ मध्ये पुणे येथे त्यांचा व्रतबंध झाला. सन १९२३ ते १९२९ पर्यंत त्यांचे उच्च शिक्षण मुंबई येथे झाले. १९२९ साली भाई एमसीपीएस झाले. १९३० ते १९४४ पर्यंत त्यांनी खाजगी प्रॅक्टीस पुणे येथे केली. ते पंढरपूर वारीस कॉलरा ड्यूटीस जात असत. त्यांचा १९३७ ते १९४४ हा आर्थिक काळ ङ्गारच हलाखीचा गेला. परंतू अध्यात्मिकदृष्ट्या त्यांची खूपच प्रगती झाली. कै.केशवराज महाराज देशमुख, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांची किर्तने प्रवचने ते ऐकत असत. वैकुंठवासी मामांचे भाईंवर ङ्गार प्रेम होते.
युद्धांमुळे औषधे खूप महागली व प्रॅक्टीस चालेना म्हणून भाईंनी सरकारी सैन्यात डॉक्टरची नोकरी धरली. त्यांचे मिल्ट्री ट्रेनिंग झाल्यावर नाशिकला मेडिकल ऑङ्गीसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९४४ ते ४६ त्यांनी मिल्ट्रीत काम केले व त्याच काळात त्यांचा प.पू.गजानन महाराज गुप्ते (नाशिक) यांचेशी संबंध आला व त्यांचेवर गुरूकृपा झाली.
प.पू.भाईंनी मिल्ट्रीमध्ये नोकरी केली असल्याने सरकारने त्यांना विचारणा केली की तुम्हास कोठे नोकरी पाहिजे. त्यावेळी वेळापूरला कोणी डॉक्टर नव्हते. पंढरपूरचे पालखी मार्गावरील गाव म्हणून त्यांची १ सप्टेंबर १९४९ रोजी वेळापूरला नेमणूक झाली व वेळापूरकरांचे भाग्य उजळले. मी ब्रह्मचारी आहे असे त्यांनी संागिल्यावर रामलिंग स्वामी जंगम यांचे वाड्यात त्यांना जागा मिळाली व तेथेच ते राहू लागले.
पंढरपूरचे वारीस जाणार्या लोकांना मामासाहेब दांडेकर म्हणाले, तुम्ही भाईंच्या मागे लागा ते केरात पडलेले माणिक आहे. कैलासवासी श्रीधरआण्णा, कैलासवासी धोंडोपंत मास्तर, शंकरराव नैवरेकर, श्री.लालासाहेब घाडगे, ति.बाळकृष्ण देशपांडे दादा वगैरे मंडळी भाईंना म्हणाले, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा. त्यानंतर धोंडोपंत देशपांडे यांचे वाड्यावर भाई ज्ञानेश्वरी संागू लागले. पहाटे व रात्री दोन वेळ श्री ज्ञानेश्वरीवर त्यांची प्रवचने होवू लागली. त्यामुळे वेळापूर येथील लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटू लागला. त्यांचा आहार ङ्गारच कमी असे. चहा, बिस्कीट व एकवेळेस काहीतरी करून खात. कैलासवासी आण्णा (श्रीधरपंत देशपांडे) यांनी त्यांना विनंती केली की मी तुम्हांला भाजी भाकरी पाठवित जाईन, त्याचा तुम्ही स्विकार करावा व त्यांनी ते मान्य केले. तो उपक्रम शेवटपर्यंत चालू राहिला.
त्यांना पगार ङ्गारच थोडा. भत्तासुद्धा १८७.५० रू. इतका मिळत असे. ते पगार पुण्यास आईवडिलांना पाठवून देत असत व येथील त्यांचा खर्च जेमतेम त्यांच्या प्रॅक्टीसवर भागत असे. लोकांकडून ङ्गार पैसे घेण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती. ते निमगांव, तोंडले-बोंडले, खंडाळी, मळोली या गावांना सायकलवरून जात असत. पुढे पुढे बैलगाडीने जाऊ लागले. त्यांच्या नोकरी काळात त्यांना कसलाही त्रास झाला नाही. अधिकारी वर्ग, सिव्हील सर्जन वगैरे त्यांना देव मानत असत. गावातील लोकांवरही त्यांचे आचरणाचा चांगला प्रभाव पडला.
सौ.कमलाताई ह्या त्यांच्या बहीण. त्यांच्या लग्नाकरिता त्यांनी काही पैसे जमविले व लोकांकडून उसने पैसे घेऊन त्यांचा खर्च भागला.
वर्षातील एक महिन्याचा पगार व लोकांकडून बिलापोटी आलेले धान्य ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे वेळी खर्च करीत असत.
कैलासवासी मामासाहेब दांडेकर आषाढ शुद्ध सप्तमीस पालखीबरोबर येत असत व प.पू.भाईंकडे उतरत असत. वारकरी शिक्षण संस्था आळंदीच्या विद्यार्थ्यांकरिता भाई धान्य व भाजीपाला दिंडीवाल्यांना देत असत व बाकी राहिलेला खर्च वारकर्यांना भाकरी वाटण्यात होत असे. प्रत्येक वद्य एकदाशीस सकाळपासूनच श्री ज्ञानेश्वरी पारायण त्यांनी सुरू केले व ते अद्यापपर्यंत चालू ठेवले आहे. प.पू.भाईंच्या आई म्हणत असत की, भाई हा तुमचा भाऊ आहे व त्या सर्वांवर पुत्रवत प्रेम करीत असत. काही दिवसांनी पूज्य भाई गणेश शंकर कुलकर्णी यांचे वाड्यात राहू लागले. पहाटेची ज्ञानेश्वरी कैलासवासी सिताराम पंढरीनाथ उरणे मास्तर यांचेकडे व सोमवारी देशपांडे वाड्यात प्रवचन होत असत.
मोहोळला कान्हनगडचे स्वामी महाराज आले होते. कैलासवासी अण्णांचे बरोबर पूज्य भाई त्यांच्या दर्शनास गेले होते. स्वामींनी दोघांनाही आशिर्वाद दिले. नंतर येताना कैलासवासी अण्णा पंढरपूर येथे राहिले व तेथेच त्यांनी देह ठेवला. प.पू.भाईंनी स्मशानात येऊन कै.अण्णांचे अंत्यदर्शन घेतले.
कै.मामासाहेब दांडेकर यांनी प.पू.भाईंना सांगितले की आपण ज्ञानेश्वरी सांगत जावी म्हणजे आपला अभ्यास होईल व त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी सांगण्यास सुरूवात केली. त्यांच्या अंगी अमानित्व व अंभनित्व्व किती जास्त आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. या मध्यंतरीच्या काळात प.पू.भाईंचे वडील दिवंगत झाले व त्यांच्यावरील मायेचे एक छत्र कमी झाले. त्यांनी इंग्लिश, मराठी व हिंदी असे कितीतरी ग्रंथ जमविले त्यांचे अखंड वाचन केले. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्यांची माहिती झाली व लोक त्यांना प्रवचनास बोलावू लागले. श्री ज्ञानेश्वरीचा अखंड ध्यास व नित्याची साधना इकडे त्यांची अधिक ओढ असे. कसलीही उपाधी नको म्हणून त्यांनी १५ मार्च १९६० या दिवशी आपले नोकरीचा राजीनामा दिला व ते नोकरीतून मुक्त झाले व ते देशपांडे वाड्यात राहू लागले. काही दिवस लोकांना त्यांनी मोङ्गत औषधे दिली व पुढे पुढे तीही डॉक्टरकी बंद करून डॉक्टरकी हा व्यवसाय बंद केला. त्यानंतरचे काळात प.पू.भाईंचे गुरूबंधू गोडबोले यांनी त्यांना नाशिकला नेले. तेथूनही भाई परत आले. श्री.नि.वा.काळे उर्ङ्ग राजाभाऊ काळे यांनी काही दिवस वालचंदनगरला राहण्यास नेले. परंतू तेथूनही भाई परत आले. श्री.बाबासाहेब समाधी मंदिर, पुणे यांनी भाईंना पुण्यास नेले. तेथूनही भाई महाराज वेळापूरला आले व म्हणाले, मळ्यात आम्हांला झोपडी बांधून द्या तेथे मला एकांत मिळेल व साधनाही होईल. त्यांनी दाखविलेल्या जागेवर देशपांडे बंधूंनी झोपडीचे बांधकाम पूर्ण केले व सदर झोपडीस ‘‘श्रीधर कुटी’’ असे नाव दिले. प.पू.भाई येथे राहण्यास आले. काही वर्षाच्या वास्तव्यानंतर ते डोंबिवलीला गेले. त्यामुळे वेळापूर परिसरातील साधकांना त्यांचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांचे साधक कै.पांडुरंग कुलकर्णी, सूर्यकांत भिसे, प्रमोद भास्करे, सतेज पैठणकर, बन्सीलाल भास्करे, संजय गिरमे व गाडीचा चालक सदा भाकरे हे सर्वजण त्यांच्या दर्शनासाठी जून १९९४ मध्ये डोंबिवलीला गेले. भाईंना खूप आनंद झाला. पुढे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान असल्याने प.पू.भाई या साधकांबरोबर त्यांचे भाचे दत्ता निमक यांच्या घरी निगडीला आले. पुढे पालखी सोहळ्यासाठी वेळापूरला तर दत्त जयंती झाली की ते निगडीला जावून राहू लागले. रविवार दि.२९ डिसेंबर १९९६ रोजी प.पू.भाई वेळापूरला आले. त्यानंतर त्यांची प्रकृती खलावत गेली व अखेर कार्तिक वद्य षष्टी २० नोव्हें. १९९७ रोजी पहाटे ६ वा. ७ मि. त्यांनी येथे देह ठेवला.
वेळापूर येथे स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांनी साधकांच्या सहकार्यातून त्यांचे भव्य समाधी मंदिर बांधले. त्यांचा जयंती उत्सव दरवर्षी कार्तिक वद्य एकादशीला रात्रौ.१०.३० वाजतां साजरा केला जातो तर कार्तिक वद्य षष्टी रोजी पहाटे ६ वा. ७ मि. त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. प.पू.भाईंनी आपल्या हजारो साधकांना सोऽहम् हा नाममंत्र देवून त्यांच्या जीवनाचे कल्याण केले आहे.
सोऽहम् नाम जपसार | पिऊं आम्ही निरंतर |
गाठू परानदीचा तीर | तरीच जाय ॥
सत्यसंकल्प सदा धरणे | गुरूवरी भार ठेवणें |
संसारी निःसंग राहणे | उणे काय हो त्यास |
दाता एक सद्गुरू | ईश्वर त्यापुढे लेकरूं |
सद्गुरू या विश्वंभरू | ध्यास सदा ॥

No comments:
Post a Comment